जन्मस्थान
विनोबांचे घर ज्यावर आहे तो भूखंड ३५ गुंठ्याचा म्हणजे १ एकरापेक्षा थोडा कमी आहे. त्यांचा जन्म झाला ते मुख्य घर गावातील मुख्य रस्त्यालगत आहे व घराच्या तीन बाजूंना शेतजमीन आहे. एका बाजूला शैक्षणिक केंद्र उभारण्याच्या उद्देशाने बांधलेली इमारत आहे. नुकतेच या इमारतीचे नूतनीकरण होऊन तीवर एक मजला चढविण्यात आला आहे. भूखंडाच्या मध्यभागी एक विहीर आहे व त्यातून शेतीसाठीच्या पाण्याची गरज भागविण्यात येते. मुख्य घराच्या पाठीमागे गायींसाठी गोठा आहे.
या भूखंडावर काही जुने वृक्ष उभे आहेत तसेच भूखंडालगत असलेल्या पाणीसाठ्याकडे जाणारे उतार आहेत. भूखंडाच्या एका बाजूला गावातील जुने मंदिर आहे.
१८०७ साली नरसिंह कृष्णराव भावे यांना गागोदे गाव मिळाले होते तेव्हा हे घर बांधले होते. त्यानंतरच्या काळात मूळ बांधकामात बदल करण्यात आले. विनोबांचा जन्म येथे झाला व वयाची पहिली १० वर्षे, १८९५ ते १९०५, त्यांनी येथे घालवली. त्यानंतर भावे कुटुंब बडोद्याला स्थलांतरित झाले. १९२० व १९३६ सालात काही दिवस विनोबांनी या वास्तूत वास्तव्य केले. १९५५ नंतर, विनोबांची शिकवण व तत्त्वज्ञानाच्या प्रसारासाठी सर्वोदय चळवळीच्या माध्यमातून येथून कार्य चालविले जात आहे.
विनोबाजींच्या आयुष्यात या ठिकाणी घडलेल्या काही ऐतिहासीक घटना :
२७ फेब्रुवारी १८८६ : वडील नरहर भावे यांचे लग्न
११ सप्टेंबर १८९५ : विनोबा भावे यांचा जन्म
१९०१ : विनोबा भावे यांची मुंज
१६ ऑक्टोबर १९०३ : भाऊ, शिवाजी यांचा जन्म
८ एप्रिल १९०६ : बहीण, शांती हीचा जन्म
१९२६ : भाऊ बाळकोबा यांचे वास्तव्य
१४ ते १७ एप्रिल १९३६ : विनोबा भावे यांचे वास्तव्य
२३ डिसेंबर १९५४ : भावे कुटुंबाने भूदान चळवळीस आपली जमीन दान केली
३ फेब्रुवारी १९६३ : गागोदे गाव ग्रामदान म्हणून जाहीर