खादी

१९१६ साली विनोबा गांधीजीकडे आले. तेथपासून १९५१ ला भूदानयात्रेस प्रारंभ होईपर्यंत म्हणजे जवळ-जवळ तीन दशकांहून अधिक काळ विनोबांनी खादीकार्यात घालवला. आठ-आठ तास विणकाम व सूतकताई करून अनेक प्रयोग केले. आज जी तलम खादी निर्माण होते आहे त्याचे श्रेय विनोबांच्या या तपश्चर्येला दिले पाहिजे.

विनोबांना चरखा हा ग्रामराज्य आणि रामराज्याचा प्रतिनिधी, हरिजन-परिजन भेद मिटविणारा आणि सर्वधर्म व पंथांना एका प्रेमसूत्रात बांधणारा नवयुगाचा संदेशवाहक वाटतो. प्रस्थापित समाजव्यवस्थेच्या विरोधात उभा केलेल्या बंडाचा, ‘चरखा’ हा झेंडा आहे असे ते म्हणतात.

अन्न आणि वस्त्र ह्या जर माणसाच्या मूलभूत गरजा असतील तर त्याचे प्राथमिक ज्ञान सर्वांना असलेच पाहिजे. विनोबा शेतीला ‘अन्नपूर्णा’ व चरख्याला ‘वस्त्रपूर्णा’ म्हणतात. अशा या अन्नपूर्णा व वस्त्रपूर्णाची उपासना प्रत्येकाने रोज करावी असे त्यांचे म्हणणे आहे. चरखा हे अहिंसेचे प्रतीक आहे. अहिंसाधर्माची उपासना चरख्याने होते. माळ जपल्याने फक्त उपासनाच होते. पण चरख्यात अशी खुबी आहे, की उपासना व उत्पादन दोन्ही साधले जाते.

विनोबांचे म्हणणे आहे, की प्रत्येक व्यक्तीने फक्त अर्धा तास जरी सूतकताईला दिला तरी साऱ्या देशातील लोक वस्त्राच्या बाबतीत स्वावलंबी होऊ शकतील. यासाठी त्यांनी मोठे गमतीदार पण चपखल उदाहरण दिले आहे. ते म्हणतात, माणसाला दात घासायला रोज दहा मिनिटे लागतात. जर दुसऱ्यांकडून दात घासून घेतले तर एक मजूर आठ तासांत पत्रास माणसांचे दात घासेल. या हिशेबाने करोडो लोकांचे दात घासायला कितीतरी मजूर व यंत्रसामग्री लागेल. पण या देशात प्रत्येक जण आपले दात सकाळी उठून स्वत:च घासतो. त्यामुळे देशात दात घासण्याचा कार्यक्रम दहा मिनिटांत आटोपतो. तसेच जर प्रत्येकाने रोज अर्धातास सूतकताई केली तर कापडगिरण्या न उभारता सारे देशवासी वस्त्रस्वावलंबी होऊ शकतात.पण असे न झाल्याने कापड-उद्योगाचे केंद्रीकरण झाले. शहरात मोठ्या कापड-गिरण्या उभ्या राहिल्या. खेडी ओस पडली व अतिरिक्त लोकसंख्येने  शहराचे प्रश्न गुंतागुंतीचे झाले. मालक व मजूर असे दोन वर्ग निर्माण झाले आणि संघर्ष निर्माण होऊन शांती नाहीशी झाली. विनोबांचे म्हणणे आहे, की प्रत्येकाने रोज अर्धातास सूत कातले तर हे प्रश्न मूळातूनच नष्ट होतील.

स्वत: कातलेल्या सुताचे कपडे घालण्याचा आनंद काही औरच असतो. अशा स्वावलंबी वस्त्राचा परिणाम माणसाच्या चित्तावर होऊन त्याचे मन जागृत होऊन ‘मी कोणाचा गुलाम नाही व न मी कोणाला गुलाम बनवीन’ ही भावना निर्माण होते, जी भावना शोषणमुक्त अहिंसक समाज-रचना निर्माण करण्यास पूरक होते असे विनोबांचे प्रतिपादन आहे.

खादी म्हणजे अहिंसेचे व गरिबाशी एकरूप होण्याचे प्रतीक असल्याने, ती जरी महाग असली तरी ती घेतली पाहिजे असे विनोबा आग्रहपूर्वक म्हणतात. त्यांच्या दृष्टीने शोषणरहित व पूर्ण मजुरी देऊन निर्माण झालेल्या खादीचा ‘महागाई’ हा गुणच आहे. जर थोडी महाग खादी खरेदी केल्याने अनेकांचे पोट भरत असेल तर हा त्याग आपण केला पहिजे. हवे तर अधिक दिलेला पैसा ‘गुप्तदान’ समजा. म्हणून त्यांचे म्हणणे, की खादी आपल्याला त्याग शिकवते व गुप्तदानाचे पुण्यही देते. खादी ही मानवतेची दीक्षा देणारी आहे. खादी केवळ वस्त्र नाही; तो एक विचार आहे हे समजून घेणे गरजेचे आहे.

कलाकार: फराह इरानी