अध्यात्म आणि विज्ञान

विनोबांनी सर्वोदयाची गणितीभाषेत सूत्रमय व्याख्या केली आहे. ती अशी – ‘अध्यात्म + विज्ञान = सर्वोदय’

अध्यात्माचे लक्षात येणारे पाच अंश विनोबांनी थोडक्यात असे सांगितले आहेत.

१) निरपेक्ष नैतिक मूल्यांवरील श्रद्धा

२) जीवनाची मरणोत्तर अखंडता

३) प्राणिमात्राची एकता आणि पावित्र्य

४) विश्वात व्यवस्था आणि बुद्धी असणे

५) पूर्णतेच्या अनुभवाची संभवनीयता

विनोबांना विज्ञान व अध्यात्म यात, सत्याचा शोध हे समानतत्त्व दिसते. विज्ञान व अध्यात्म यांच्याद्वारे विश्वाचे ज्ञान होऊ शकते. विज्ञान विश्लेषण करते तर अध्यात्म संश्लेषण (सिंथेसिस). विज्ञान बाह्य प्रमाणाने शोध घेते तर अध्यात्म आंतरिक प्रतीतीने शोध घेते असे विनोबा म्हणतात.

विनोबांचे म्हणणे आहे, की विज्ञान नीति-निरपेक्ष आहे. ते ना नैतिक आहे, ना अनैतिक. विज्ञानात विनाशक व विकासक दोन्ही शक्ती आहे. म्हणून विज्ञान सेवाही करू शकेल व संसारही. विनोबांचे म्हणणे असे, की याचसाठी विज्ञानाला मूल्याची व अध्यात्माची आवश्यकता आहे. विज्ञानाला चुकीचे मार्गदर्शन मिळाले तर विज्ञान नरकाचा मार्ग होऊ शकते व योग्य मार्गदर्शन मिळाले तर स्वर्गाचा मार्ग होऊ शकते. म्हणून विज्ञानाला अध्यात्माची जोड हवी. विज्ञान जीवनाला रूप व गती देते तर, अध्यात्म जीवनाला शक्ती व दिशा देते. विज्ञान पाय आहेत तर अध्यात्म डोळे. हे विज्ञानयुग आहे व म्हणून अध्यात्माची आज सर्वाधिक गरज आहे असे विनोबांचे सांगणे आहे.  

विनोबा नि:शंकपणे व आत्मविश्वासपूर्वक असे म्हणतात, की यापुढे राजनीती व धर्मपंथ नष्ट होतील व फक्त अध्यात्म व विज्ञान टिकणार आहे. हे दोघे मिळून जोडण्याचे काम करू शकतात. म्हणून अध्यात्म व विज्ञान यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. विज्ञान नीतिनिरपेक्ष आहे व जर विज्ञानाची जोड राजनीतीला मिळाली तर सर्वनाश अटळ आहे. म्हणून विनोबा सूत्रमय पद्धतीने समजावतात-

राजनीती + विज्ञान = सर्वनाश

अध्यात्म + विज्ञान = सर्वोदय

धर्म-विचार

विनोबांना अभिप्रेत असलेला धर्म हा मानवधर्म आहे. विनोबा म्हणतात, “धर्म हा एक व्यापक शब्द आहे. आपले जीवन ज्या नीतिविचारांवर आधारलेले असते त्याला आपण धर्म म्हणतो. धर्म अविचल आहे व त्याची तत्त्वे पक्की असतात.” श्रद्धा, सत्य, प्रेम आणि त्याग ही चार पक्की तत्त्वे त्यांनी सांगितली आहेत. मानवधर्म आपल्या परिशुद्ध सत्य तत्त्वाच्या आधारानेच पसरू शकतो असे विनोबा म्हणतात.

हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन हे धर्म नसून पंथ वा फेथ आहेत असे विनोबा म्हणतात, एखाद्या संताला वा महापुरुषाला सत्य-प्रेमाचा साक्षात्कार होतो व अशा साक्षात्कारी माणसावर जे लोक श्रद्धा ठेवतात ते त्या ‘फेथ’ चे झाले. म्हणून प्रचलित धर्मासाठी विनोबा ‘फेथ’ असा शब्द उपयोजितात.

ज्याच्या विरोधात जाण्याची कोणाला इच्छाच होणार नाही अशा खऱ्या धर्माची स्थापनाच अजून झालेली नाही, कारण सर्वच धर्म मानसिक भूमिकेवर राहिलेत. आता धर्म जेव्हा विज्ञानाच्या भूमिकेवर येईल तेव्हा खरा धर्म बनेल. कारण विज्ञान-युगात व्यापक भावनाच टिकेल, संकुचित भावना टिकणार नाही, असे विनोबांचे सांगणे आहे.

आज धर्म व व्यवहार यांची फारकत झाली आहे. धर्म हा पुजारी, मुल्ला व पादरी यांच्या हाती असून मंदिर, मस्जिद व चर्चमध्ये कैद आहे. या कैदेतून धर्माची सुटका करून खरी धर्मभावना सर्वत्र पसरावयाची आहे व अशा धर्माने व्यवहाराची सर्व नाकी काबीज केली पाहिजेत. व्यवहारात, व्यापारात व राजकारणातही धर्माने शिरकाव केला पाहिजे असे विनोबा म्हणतात. आज जी धर्म व व्यवहाराची फारकत झाली आहे ती त्यांना मंजूर नाही.

सर्व धर्म समान असल्याने व सर्व धर्माचे सार एकच असल्याने हिंदूनी उत्तम हिंदू, मुसलमानांनी उत्तम मुसलमान व ख्रिश्चनांनी उत्तम ख्रिश्चन बनावे असे विनोबा म्हणतात. सर्व धर्म समान असल्याने धर्मांतराची कल्पना त्यांना चुकीची वाटते. एवढेच नव्हे, तर ती त्यांना धर्माची विटंबना वाटते. व म्हणून सेक्युलर स्टेटमध्ये धर्मांतराचा निषेध व्हायला हवा व धर्मांतराला कायद्याने बंदी असली पाहिजे अशी ते मागणी करतात.

विनोबांना संततीद्वारे होणार धर्मवर्धन मंजूर नाही. अमुक धर्माच्या आई-बापाच्या पोटी जन्माला आला म्हणून तो त्या धर्माचा झाला हे ‘ऑटोमॅटिक यंत्र’ बंद झाले पाहिजे असे ते म्हणतात. अठरा वर्ष वयानंतर प्रत्येकाने आपला धर्म जाहीर करावा असे विनोबांचे सांगणे आहे.

व्यापक भावनेला विनोबा धर्म म्हणतात. विनोबांसाठी हा व्यापक धर्म म्हणजेच मानवधर्म आहे. विज्ञान-युगात व्यापक भावनाच टिकणार असल्याने विनोबा म्हणतात, “भारताचा धर्म-विचार वैज्ञानिक आहे आणि आम्ही विज्ञानाचे स्वागत करतो हे दाखवून, देण्याची संधी आता भारताला मिळाली आहे.”

Upcoming Events

Artist : Sanjeev Joshi