शिक्षण

आत्मनिर्भरतेसाठी शिक्षण हा विनोबांच्या शिकवणीतील मूलभूत मुद्दा होता. शैक्षणिक कार्यक्रम हा जन्मस्थानामधील कामांचा नेहमीच एक अविभाज्य भाग असत आला आहे.

१४ ते १८ नोव्हेंबर १९५३ या काळात वामनराव लिमये व भाई धवन यांच्या नेतृत्वखाली जन्मस्थानामध्ये भूदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरातच विनोबांचे जिवंत स्मारक म्हणून वामनराव लिमये यांनी १७ नोव्हेंबर या दिवशी जन्मस्थानाच्या आवारात गागोदे गावातील मुलांसाठी शाळा सुरु केली. वामनराव लिमये व भाई धवन यांच्या प्रयत्नांनी १९५५ साली जन्मस्थान हे नोंदणीकृत प्रतिष्ठान बनले.

१९७२ ते १९८२ या काळात  जन्मस्थानामध्ये निराधार मुलांसाठी घर व वसतिगृह, तसेच गावातील मुलांसाठी बालवाडी चालविण्यात आली. १९७४ साली याच जागी बालग्रामच्या कामाची सुरुवात झाली. नंतर ही स्वतंत्र संस्था म्हणून कार्यरत झाली. महाराष्ट्रात ४ ठिकाणी या संस्थेची केंद्रे आहेत.

१९९५ साली विनोबांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने श्री. शांताराम गवाणकर यांनी जन्मस्थान येथून अनौपचारिक शिक्षणकार्यास सुरुवात केली. गावातील मुलांसाठी त्यांनी विविध शिबिरे, कार्यशाळा, अभ्यास दौरे त्याचप्रमाणे संगीत, नाट्य, क्रीडा या विषयांतील शिक्षण सत्रांचे आयोजन केले. त्यांनी जिल्हा परिषदेच्या मदतीने शाळेची इमारत बांधून घेण्यासाठी प्रयत्न केले शाळा हे एक समूह संसाधन केंद्र म्हणून उभे केले.

२०१९-२० हे विनोबांचे १२५ वे जयंती वर्ष होते. त्यानिमित्ताने ‘जन्मस्थान’ने विविध शैक्षणिक कार्यक्रम, कागद कला, शास्त्रीय नृत्य, आकाशदर्शन या विषयातील मार्गदर्शन सत्रांचे आयोजन केले होते.

१९५३ ते २०२१ या ६८ वर्षांच्या काळात जन्मस्थानामध्ये साधारण तीन पिढ्यांमधील मुलांसाठी शैक्षणिक कार्यक्रम घेण्यात आले आहेत. या शैक्षणिक कार्यक्रमांचे स्वरूप, त्या वेळीं आश्रमात असणाऱ्या सर्वोदय कार्यकर्त्यांचा कल व क्षमतेनुसार असले, तरी या सर्व कार्यक्रमाच्या गाभ्याशी विनोबांचे शैक्षणिक तत्वज्ञान असते.

या कार्यक्रमांत सहभागी झालेली मुले आता मोठी झाली आहेत व आश्रमाच्या नियमीत संपर्कात आहेत. गावात तयार झालेल्या शैक्षणिक वातावरणामुळे गागोदे गावातील पदवीधरांची संख्या, परिसरातील इतर गावांपेक्षा सर्वात जास्त आहे.

सूत कातायला शिकताना
मुलांची शेतकामात मदत
vinoba kids craft
अनुभवातून शिकणे

प्रस्तावित नयी तालीम शिक्षण केंद्र

शिक्षण केंद्रासाठी प्रस्तावित केलेल्या विद्यमान संरचनेला ते कार्यक्षम करण्यासाठी अधिक कामाची आवश्यकता आहे. उजवीकडे पाहिल्याप्रमाणे वर्गखोल्यांचा तात्पुरता आराखडा तयार करण्यात आला आहे.

प्रस्तावित अध्ययन केंद्रासाठी सध्या अस्तित्वात असलेले बांधकाम वापरात आणण्यासाठी त्यावर अधिक काम होणे गरजेचे आहे. उजवीकडे दाखविल्याप्रमाणे वर्ग खोल्यांचा साधारण आराखडा तयार करण्यात आला आहे.

अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, आत्मनिर्भरता, शारीरिक श्रम, अशा सर्वोदयाच्या ११ प्रतिज्ञांचा अनुभव घेण्यासाठी विनोबा जन्मस्थान हे अतिशय योग्य असे ठिकाण आहे. नयी तालीमच्या तत्त्वज्ञानानुसार शैक्षणिक विषयांचे अध्ययन करता करता, आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग असलेली विविध उत्पादक कामे, जसे शेती, स्वयंपाक, हस्तव्यवसाय, सूत कताई, इ. देखील शिकता येतात. येथील जैवनशैलीतून आत्मनिर्भरता शिकण्याची संधी मिळते. या ठिकाणी लोकांना पर्यावरण आणि पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन या कामांत माणसाची भूमिका या विषयी विचार करायची प्रेरणा मिळते. हे लक्षात घेऊनच ‘जन्मस्थान’ येथे खालील उपक्रम सुरू करण्याचे नियोजित आहे.

१. नयी तालीम अध्ययन व संसाधन केंद्र शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी शिबिरे घेणे. त्याचप्रमाणे नयी तालीमची तत्वे समजून घेण्यासाठी व नेहमीच्या शिकविण्याच्या प्रक्रियेत ती समाविष्ट करता यावीत याकरीता शिक्षकांसाठी प्रशिक्षण सत्रे घेतली जातील.

२. सर्वोदय अध्ययन केंद्र  – सर्वोदयचे विचार समजून घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी तसेच सर्वोदयी विचार, कृती व जीवनशैली यांचा अनुभव ज्यांना घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हे केंद्र असेल.