आचार्य विनोबा भावे यांना गांधीजींनी त्यांचे आध्यात्मिक पूर्वाधिकारी आणि अग्रगण्य सत्याग्रही म्हणून संबोधित केले होते. ‘जय जगत्’ हा नारा देणाऱ्या विनोबाजींचा जन्म पेण येथील गागोदे या गावी (जिल्हा – रायगड, राज्य – महाराष्ट्र) ११ सप्टेंबर १८९५ या दिवशी झाला. त्यांचे कुटुंब पुढे बडोदा येथे गेले. बडोद्याला त्यांनी पुढील शिक्षण घेतले. त्यानंतर गांधीजींबरोबर काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. “गांधीजींबरोबर आपल्याला शांती आणि क्रांती यांचा एकत्रित अनुभव मिळाला” असे ते सांगत.
१९२१ साली गांधीजींनी त्यांना वर्धा येथे सेवाग्राम आश्रमाची स्थापना करून तो चालवण्यासाठी पाठवले. विनोबांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला आणि त्यासाठी त्यांना अनेक वेळा कारावासही पत्करावा लागला. गांधीवधानंतर १९४८ साली, विनोबांनी ‘सर्वोदय समाजाची’ स्थापना केली. १९५१ ते १९६४ या काळात त्यांनी भारतभर पदयात्रा करून श्रीमंत जमीनधारकांना भूमीहीनांना देण्यासाठी आपली जमीन दान करण्याचे आवाहन केले. या ऐतिहासिक ‘भूदान’ चळवळीत ४७ लाख एकर जमीन दान म्हणून मिळाली. अशा प्रकारची जगातली ही एकमेव अहिंसक आणि क्रांतिकारी चळवळ ठरली.
विनोबाजी सखोल आध्यात्मिक वृत्तीचे होते. त्यांनी सर्व धर्मांचा अभ्यास करून सर्व धर्मांच्या शिकवणीची, सारांश स्वरूपात एकत्रित मांडणी केली. त्यांच्या सर्वाधिक प्रसिद्ध असलेल्या ‘गीताप्रवचने’ या पुस्तकाचा सर्व भारतीय भाषांमधे व अनेक परकीय भाषांमधे अनुवाद झाला आहे. त्यांचे सर्व लेखन १० खंडांमध्ये प्रकाशित झाले असून त्याची पृष्ठसंख्या दहा हजारांहूनही अधिक आहे.
विनोबा हे मॅगसेसे पुरस्काराचे पहिले मानकरी होते. त्यांना भारतरत्न हा सन्मानही मरणोत्तर प्राप्त झाला आहे.
१५ नोव्हेंबर १९८२ या दिवशी प्रायोपवेशन (अन्न व पाण्याचा त्याग) करून त्यांनी आपले प्राण त्यागले. जाणीवपूर्वक मृत्यूला सामोरे जाण्याची त्यांची ही कृती, त्यांच्या आध्यात्मिक जीवनातील अत्युच्च कार्याचे दर्शन घडविते.