लोकांचे धोरण
राजाचे असते ते ‘राज्य’ आणि राजाची असते ती ‘राजनीती’ व प्रजेचे असते ते ‘प्राज्य’ व लोकांची असते ती ‘लोकनीती’, तेव्हा ‘राज्य’ व ‘राजनीती’ दोन्ही कालबाह्य असून, खऱ्या अर्थाने ‘प्राज्य’ प्रस्थापित करून ‘लोकनीती’ आणली पाहिजे, असे विनोबांचे आग्रही प्रतिपादन आहे.
विनोबांच्या मते राज्यसंस्था ही अनेक अनिष्टांची मूळ आहे. शंभरातले साठ लोक मते देतात व त्यापैकी तीस मते ज्याला मिळतात त्याची सत्ता शंभर लोकांवर चालेल अशी ही राज्यसंस्था, लोकशाही व व्यवहार विनोबांना ‘बोगस’ वाटतो. दंडशक्ती, हिंसा याच्या आधारावर राज्यसंस्था उभी असते. आजच्या राज्यसंस्थेत सेवा ही सत्तेची दासी बनली आहे. म्हणून विनोबांना सेवेच्या नावाखाली जे राज्यशासन, चालू आहे त्यापासून सुटका करून घेण्याची गरज वाटते. त्यातून सुटण्याचा एकच मार्ग विनोबांना दिसतो, तो म्हणजे ‘लोकनीती’चा.
लोकनीतीविषयी विनोबा म्हणतात, “राजनीतीचे शुद्धीकरण याचा अर्थ आहे राजनीतीच्या जागी लोकनीतीची स्थापना करणे… राजनीतीचे विज्ञानयुगात निभणारही नाही आणि ती राहणारही नाही. म्हणून लोकनीतीच्या स्थापनेशिवाय विज्ञानयुगात राजनीतीला शुद्ध करण्याचा दुसरा कोणता मार्ग नाही.”
स्वयंशासन, आत्मनियंत्रण, स्वालंबन, प्रेम व सद्व्यवहार, अपरिग्रह, व सत्ता-निरपेक्षजीवन, सर्वानुमतीने निर्णय, हे सारे लोक जेव्हा आपल्या जीवनात आणतील व विकेंद्रीकरण व ग्रामनियोजन बनेल तेव्हा लोकनीती आपसूक येईल. विनोबा म्हणतात. “जनतेच्या नैतिक शक्तीची पातळी जसजशी उंचावत जाईल तसतशी राज्यसत्तेची सत्ता चालविण्याच्या शक्तीची पातळी क्षीण होत जाईल, म्हणजे तिची सत्ता कमी कमी होत जाईल. अखेर तर तिचे अस्तित्वच राहणार नाही. शासनहीन समाज आमचा आदर्श नाही. आमची तर इच्छा शासनहीनता जाऊन सुशासन व्हावे व नंतर तेही जाऊन शासनमुक्त समाज बनावा अशी असेल. अशा समाजात दंडाची, शिक्षेची गरजच राहणार नाही. अशा समाजातील लोक स्वत: होऊन त्या नैतिक विचाराप्रमाणे असतील-तो समाज स्वयंशासित असेल.” असे झाले म्हणजे, “सर्व भौतिक सत्ता गावात असेल आणि केंद्रात नीतिमान, चारित्र्यशील लोक जातील. त्यांची नैतिक सत्ता चालेल” आणि लोकनीती निर्माण होईल.
विनोबांचे म्हणणे असे, को राष्ट्रीय नियोजन करण्याऐवजी ग्रामनियोजन होणे आवश्यक आहे. सगळ्या योजना लोकांमार्फत तयार झाल्या पाहिजेत. ते म्हणतात, “लोकांमार्फत शिक्षणाची योजना चालली आणि सरकारचे शिक्षणखाते संपले तर देशाला आणखी एक स्वातंत्र्य मिळेल. याप्रमाणे सरकारचे एक एक कार्य जनतेच्या हाती येईल आणि सरकारची सत्ता क्षीण होत जाईल, तर जगात अहिंसा आणि शांती टिकू शकेल.”
बऱ्याचदा आपण व्यवहारात साधनशुचिता पाळत नाही म्हणून न्यायालये, पोलीस, सैन्य लागते. जर लोक स्वयंशासित असतील तर न्यायालये, पोलीस यांची गरज संपेल. अशी नैतिक-शक्ती वाढवण्यासाठी नि:शस्त्रीकरण केले पाहिजे. हिंदुस्थानसारख्या देशाला आजूबाजूचे देश गिळंकृत करतील किंवा आक्रमण करतील अशी भीती वाटण्याचे कारण नाही. हिंमत धरून नि:शस्त्रीकरण केले पाहिजे. तेव्हाच बोलण्याला ताकद येईल. मजबूत शस्त्रामुळे आपल्या शब्दांत ताकद येऊ शकेल अशी समजूत आहे ती चुकीची आहे. प्रश्न तेव्हाच सुटतील, जेव्हा आपण निःशस्त्रीकरण करू.“… सूर्याची किरणे पसरली, की सर्व लोक आपली अंथरुणे गुंडाळतात. ज्यांनी अंथरुणे घातली होती तेच लोक ती गुंडाळतात. त्याच प्रमाणे ज्यांनी शस्त्रास्त्रे तयार केली आहेत त्या लोकांच्या जेव्हा असे लक्षात येईल, की ह्यांनी प्रश्न सुटणार नाहीत तेव्हा तेच शस्त्रांचा नाश करतील.”
ही लोकनीती व शासनमुक्त समाज एकदम येणार नाही याचे विनोबांना भान आहे म्हणूनच ते ‘शासनहीनता जाऊन सु-शासन व्हावे व नंतर तेही जाऊन शासनुमक्त समाज बनावा’ असे म्हणतात.
विनोबांचे म्हणणे, की लोकनीतीसाठी लोकांना केवळ सु-शासनासाठी नव्हे, तर स्वयंशासनासाठी तयार करावयाचे आहे. त्यासाठी विकेंद्रित सत्ता गावोगावी वाटली गेली पाहिजे व प्रेम व अहिंसेची लोकांत भावना निर्माण केली पाहिजे. हे कठीण असले तरी विनोबांना हे अशक्य वाटत नाही.