ग्रामदान

भूदान म्हणजे जमीन दान करणे. भूदान चळवळ ही स्वेच्छेने करण्याची जमीनसुधारणा चळवळ विनोबांनी सुरु केली होती. १८ एप्रिल १९५१, या दिवशी तेलंगण मधील पोचमपल्ली गावात त्यांना पहिला भूखंड दान म्हणून मिळाला. तेथूनच भूदान यात्रेचा प्रारंभ झाला. ज्याप्रमाणे पाणी, हवा, सूर्यप्रकाश देवाचे आहेत त्याप्रमाणे जमीनही देवाची मालमत्ता आहे. त्यावर कुणाची वैयक्तिक मालकी असू शकत नाही व ती सगळ्यांना वापरता यायला हवी, हा यामागचा मूळ विचार होता.

११ सप्टेंबर १९५२, या दिवशी विनोबांचे चुलत बंधू रघुनाथ भावे यांनी गागोदे येथील आपल्या कुटुंबाची जमीन दान करून रायगड जिल्ह्यात भूदान चळवळीची सुरुवात केली. १४ नोव्हेंबर १९५३ या दिवशी त्यांनी आणखी ६७ एकर जमीन दान केली. त्या वेळचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांच्या हस्ते, २३ सप्टेंबर १९५४, या दिवशी भावे कुटुंब व जन्मस्थानाच्या इतर विश्वस्तांनी दान केलेली जमीन गागोदे व परिसरातील गावांमधील आदिवासींना देण्यात आली.  १९७० सालापर्यंत रायगड जिल्ह्यात सर्वोदयी कार्यकर्त्यांना भूदानाद्वारे ३७३८ एकर जमीन मिळाली.

ग्रामदान – यामध्ये एकत्रित मालकीसाठी संपूर्ण गाव (गावातील जमीन) दान केले जाते.

विनोबांना १ मे १९५२ या दिवशी उत्तर प्रदेशमधील मंगरोठ या गावाचे पहिले ग्रामदान मिळाले. ग्रामदान ही भूदानाची पुढील पायरी आहे. ज्यामध्ये मालकीची संकल्पना गावपातळीवर आणली जाते. विनोबा पुढे म्हणतात, “जमीन ही ईश्वराची निर्मिती आहे, फक्त ईश्वराचीच तीवर मालकी असू शकते. आपण जमिनीचे पुत्र असू शकतो, जमिनीचे सेवक असू शकतो. जमिनीचे मालक कसे असू शकतो?” भूदान हा जमिनीच्या समान वाटणीचा विचार आहे तर ग्रामदानामध्ये जमिनीची मालकी समर्पित करण्याचा विचार आहे.

जमिनीची मालकी समर्पित करणे म्हणजे लोक त्यांची जमिनीवरील मालकी गावाकडे देतात. जमीन कसण्यासाठी पिढ्यानपिढ्या त्याच कुटुंबाकडे रहाते, मात्र ते ती विकू शकत नाहीत. ११ सप्टेंबर १९६३ या दिवशी गागोदे गावच्या गावकऱ्यांनी गागोदे ग्रामदान जाहीर केले. सर्वोदयी कार्यकर्त्यांनी रायगड जिल्ह्यात फिरून या घटनेचा प्रसार केला व १३१ गावांचे ग्रामदान प्राप्त केले. 

आता भूदान चळवळ सक्रीय नसली तरीही जमिनीच्या न्याय्य व समान वाटणीची संकल्पना दूरदर्शी होती. विनोबांच्या काळाइतकीच ती आजही समयोचितआहे. गागोदे हे या प्रयोगाचे प्रत्यक्ष उदाहरण आहे. जन्मस्थानमधील लोक आजही भूदान संकल्पनेला प्रोत्साहन देत त्याबद्दल लोकांशी बोलतात.

कलाकार: अश्विन चिकेरुर

गागोदे गावाबद्दल

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात गागोदे गाव वसलेले आहे. प्रामुख्याने शेती असणारे हे खेडे विनोबा भावे यांच्या पूर्वजांना इनाम म्हणून मिळाले होते. १९५४ साली भावे कुटुंबाने ते भूदान चळवळीस दिले व १९६३ साली ते ग्रामदान म्हणून घोषित केले गेले.

गागोदे बुद्रुक

गागोदे बुद्रुक (खालापूर P., 18� 45′ N. 73� 10′ E.; p. 375) हे भूदान चळवळीचे प्रणेते विनोबा भावे यांचे जन्मस्थान आहे. त्यांच्या घरातील ज्या खोलीत त्यांचा जन्म झाला त्या खोलीत त्यांचा पुतळा आहे. येथे गांधी सेवक समाजाचे ग्रामकेंद्र व विनोबा भावे आश्रम स्थापन करण्यात आला आहे. बाबुराव आंग्रे यांनी त्यांना मदत केल्याबद्दल रास्ते यांना हे गाव इनाम दिले होते. नंतरच्या काळात रास्ते यांच्याकडून ते भावे यांना देण्यात आले. या गावाच्या दक्षिणेकडे असलेल्या खिंडीत असलेला ‘कल्याण खजिना’ सैतान माज या गावी, शिवाजी महाराजांच्या सैन्याने, आबाजी सोनदेव यांच्या हुकुमावरून लुटला होता. 

(संदर्भ :  https://cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/KOLABA/places_Gagode.html)