गोमाता

गोसंरक्षणाचा मुद्दा सोडवण्यासाठी विनोबा आणि गांधींनी चर्मउद्योगाच्या प्रश्नाचा थेट सामना केला. विनोबांचे मानणे होते की, जोवर चामड्याची मागणी आहे, तोवर कातड्यासाठी गायींची हत्या होत राहणार. गायींचे कातडे कमावण्याचे काम सहसा खालच्या जातींतील लोकांवर सोपविले जायचे, ज्यांना अस्पृश्य समजले जायचे. हा प्रश्न सोडविण्यासाठी गांधी आणि विनोबा दोघांनीही उच्च जातीतील लोकांना मृत जनावरांचे चामडे काढण्याचे प्रशिक्षण द्यावे असे सुचविले होते. जातीव्यवस्थेत उतरंडीमध्ये ही क्रांतिकारी सुधारणा होती. असे करून त्यांनी समाजातील जातीव्यवस्थेमधील उच्च आणि नीच संकल्पनेलाच आव्हान दिले होते. मृत गायी त्यांचे कातडे काढण्यासाठी लवकरात लवकर नेता याव्यात म्हणून ‘चर्मालय’ म्हणजेच कातडे काढण्याची जागा गायींच्या निवासाच्या जवळच असावी असे विनोबांनी सुचविले होते.

गायींची काळजी (गोसंवर्धन)

गागोदे येथे, जन्मस्थान प्रतिष्ठानामध्ये अनेक गायींचा सांभाळ केला जातो. या पैकी काही गायी वृद्ध व भाकड आहेत. पारंपरिक पद्धतीने चरण्यासाठी रोज या गायींना जंगलात सोडले जायचे. मात्र नंतर या पद्धतीमुळे काही गायी चोरीला गेल्या. आश्रम परिसरात गायी असणे महत्वाचे आहे कारण ते येथील जीवनशैलीच्या गोसेवा या पैलूशी संबंधित आहे. त्यामुळे गायींचा सांभाळ महत्वाचा आहे.

सध्या जन्मस्थान येथे ८ गुरं असून त्यापैकी ४ बैल आहेत व ४ गायी आहेत. गायींचे शेण हे एक महत्वाचे संसाधन आहे. येथे बांधलेल्या बायो गॅस संयंत्राद्वारे गायीचे शेणापासून गॅस निर्मिती केली जाते तर स्लरीचा वापर खत म्हणून होतो. यामुळे सेंद्रिय पद्धतीने पिके घेता येतात. अशाप्रकारे गोशाळेमुळे शेताचा कस वाढण्यात मदत झाली आहे. काही प्रमाणात शेताच्या नांगरणीसाठी बैलांचा उपयोग होतो. जन्मस्थानाच्या स्थापनेपासून या वास्तूमध्ये शेणाने सारवलेली जमीन आहे. त्यासाठीही गोशाळेतील शेणाचा वापर होतो.

गोसंरक्षण

१९८२ साली पाळीव जनावरांच्या हत्येला संपूर्ण प्रतिबंध व्हावा अशा कायद्यासाठी विनोबांनी आपल्या शिष्यांना देवनार येथील खाटीक खान्यासमोर सत्याग्रह करण्यास सांगितले. त्यांनी या सत्याग्रहाचे नेतृत्व अच्युत देशपांडे या उदारमतवादी स्वतंत्रसैनिकाकडे सोपविले. नंतर ते विनोबा जन्मस्थान प्रतिष्ठानाचे प्रमुख झाले. गोवंश हत्याबंदीच्या त्यांच्या प्रयत्नांत अन्य विश्वस्तही सामील झाले.

गांधी आणि विनोबांनी गायींची काळजी व गोसंरक्षण यातील फरक अतिशय स्पष्टपणे सांगितला आहे. चामड्यासाठी गायींची हत्या होत असल्यामुळे त्यांना काळजी बरोबरच संरक्षणाचीही गरज आहे. याकरिता नैसर्गिक रित्या मृत झालेल्या जनावरांच्या कातड्यापासूनच चामडे तयार करावे असा सल्ला गांधी आणि विनोबांनी दिला. याप्रकारे केवळ चामड्यासाठी होणारी गायींची हत्या आपण थांबवू शकू. मात्र प्रत्यक्षात हे साध्य होण्यासाठी कातडे काढण्याची प्रक्रिया गायींच्या निवासाजवळच व्हायला हवी. म्हणजेच विकेंद्रित पद्धतीने व्हायला हवी. गोसेवा म्हणजे गायींचे संगोपन करणे तर गोरक्षण म्हणजे गायींचे कत्तल होण्यापासून रक्षण करणे.

गोसंरक्षणाबरोबरच कातडे काढण्याचे काम जात विभागणीशीही संबंधित आहे. हे काम अप्रिय असल्यामुळे पारंपरिक रीतीने चामडे काढण्याचे काम खालच्या जातींकडे सोपविले होते. अशा प्रकारे या कामामुळे जाती जातींमधील दरी जास्त खोल झाली होती. सर्वांनीगोरक्षेच्या कामात मदत करावी हा विनोबांचा आग्रह म्हणजे या पारंपरिक विभागणीला दिलेले आव्हान होते.

विनोबा जन्मस्थान प्रतिष्ठानामध्ये, गोसेवा व गोरक्षा ही दोन्ही कार्ये पुढे सुरू ठेवली गेली आहेत. गोशाळेतून दूध, तूप, इंधन (बायो गॅस), खत, लिंपणासाठी शेण मिळते व एखादे जनावर मृत झाले तर तेथेच त्याचे कातडे कमावण्यासाठी काढले जाते.

 

 

जन्मस्थानच्या भेटीतील गायी व वासरांबरोबर घालवलेला वेळ हा सगळ्यात जास्त स्मरणात राहील असा असतो. सर्व जीवांबद्दल प्रेम व आदर ही विनोबांची मूलभूत शिकवण आहे.

गायीच्या शेणाची उत्पादने

वृद्ध व भाकड गायींचीही देखभाल करता यावी याकरिता जन्मस्थान मधील लोक, गायीच्या शेणाची उत्पादने तयार करत आहेत ज्यामुळे अशा गायींच्या देखभालीकरिता काही अर्थार्जन होऊ शकते.

असे पहिलेवहिले उत्पादन इकोएक्झिस्ट (eCoexist) फौंडेशन बरोबर तयार करण्यात आले आहे. – या गायीच्या वाळलेल्या गोवऱ्यांना ‘गौर्वर’ असे नाव दिले आहे. यज्ञ व पूजा प्रसंगी त्या जाळतात. 

गोवऱ्या खरेदी करण्यासाठी कृपया आम्हाला खालील ई मेल वर संपर्क साधा

[email protected]