इतिहास

या ठिकाणाचे महत्व केवळ विनोबांचे जन्मस्थान म्हणून नसून, इतरही अनेक ऐतिहासिक घटनांची येथे साक्ष मिळते. विनोबांचे खापर पणजोबा नरसिंह कृष्णराव भावे हे पेशव्यांचे सरदार होते. त्यांच्या शौर्याची दखल घेत अलिबागचे सरदार आंग्रे यांनी १८०७ साली गागोदे गाव त्यांना इनाम म्हणून दिले.

१९०८ साली विनोबांचे काका गोपाळराव भावे यांच्यावर क्रांतिकारी कान्हेरे बंधू यांच्यासह ब्रिटिश अधिकारी जॅक्सन याच्या खुनाच्या कटात सामील असल्याचा संशय घेऊन त्यांच्याकडून त्यांची बंदूक काढून घेण्यात आली होती. १९१८ साली लोकमान्य टिळकांनी गागोदे गावाला भेट दिली तेव्हा याच काकांनी त्यांच्या स्वराज फंडासाठी रु. १०० देणगी दिली होती.

विनोबांच्या बालपणातील वयाच्या १० वर्षापर्यंतचा काळ या घरात गेला. आपल्या आजोबांकडून व आईकडून त्यांनी अध्यात्माचे धडे घेतले तर वडिलांकडून वैज्ञानिक दृष्टिकोन घेतला. नंतर त्यांच्या वडिलांनी बडोद्याच्या महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या राजवाड्यात नोकरी पत्करल्यामुळे भावे कुटुंब बडोद्याला गेले. 

या स्थानाचे महत्व ओळखून विनोबांच्या शिष्यांनी येथे आश्रम सुरु केला व त्यांची शिकवण आणि तत्वे यांवर आधारित विविध कार्यक्रम सुरु केले.

भारताचे भविष्य घडवण्यात विनोबांचे जे योगदान आहे ते लक्षात घेता विनोबा जन्मस्थानाचे ऐतिहासिक महत्व लक्षात येऊ शकते.

 

खालील महत्त्वाच्या व्यक्तींनी आजवर जन्मस्थानाला भेट दिली आहे:

  • न्यायमुर्ती सत्यरंजन धर्माधिकारी
  • डॉ अभय बंग
  • डॉ अ‍निल काकोडकर
  • मेधा पाटकर
  • अण्णा हजारे
  • निखिल वागळे
  • बाबा आढव
  • कलाकार सुहास बाहुलकर
  • मुक्ता वैशम्पायन
  • कालिंदीताई
विनोबा १९५३ च्या 'टाईम' (TIME) नावाच्या नियतकालिकावर