स्त्रीशक्ति

विनोबांचे म्हणणे असे, की जोपर्यंत स्त्रियांना आध्यात्मिक अधिकार मिळत नाही, त्यांच्यामध्ये ब्रह्मचर्य हे तत्त्व दाखल होत नाही व जोपर्यंत त्या शंकराचार्यांप्रमाणे प्रखर वैराग्यसंपन्न होत नाहीत तोपर्यंत स्त्रियांचा उद्धार होणे शक्य नाही व जोपर्यंत स्त्रियांचा उद्धार होणार नाही तोपर्यंत मानवाचाही उद्धार होणार नाही. म्हणून विनोबा म्हणतात, की स्त्री-पुरुष-भेद राहणार नाही असे नवीन शास्त्र स्त्रिया निर्माण करतील तेव्हा मानवधर्माचा उदय होईल.

स्त्रियांच्या हातात शस्त्र दिले म्हणजे ती निर्भय होईल ही गोष्टच विनोबांना चुकीची वाटते. मनुष्य प्रथम निर्भय असावा लागतो. मग शस्त्र त्याला हवे तर पूरक वा मदतरूप होऊ शकेल. मनात भय असेल तर शस्त्र निरुपयोगीच ठरेल. यासाठी विनोबा म्हणतात, “आज मुळी आमचे सारे जीवनच शरीर-प्रधान झाले आहे. आपण सौंदर्याविषयी विचार करीत असलो काय किंवा बलाविषयी विचार करीत असलो काय, आपली दृष्टी ही शरीरप्रधानच असते. जोपर्यंत ही शरीरपरायणता राहील तोपर्यंत स्त्रियांच्या मनात भीती कायम राहील… म्हणून आपण आत्मशक्तीवर अवलंबून राहिले पाहिजे. ह्या आत्मशक्तीची स्त्रियांत काही कमतरता नाही, परंतु ती प्रकट करण्याकरिता त्याला अनुकूल असे जीवन केले पाहिजे. असे झाले तर ‘कुठल्याही परिस्थितीत स्त्री ही आत्मबलाने स्वत:चा बचाव करू शकते. शारीरिक बलाच्या आधारावर अवलंबून राहण्याऐवजी आत्मिक बलाच्या आधारावर जीवन जगण्याची कला शिकायला हवी’ असे विनोबांचे म्हणणे आहे.

जोपर्यंत देशाचे संरक्षण सैन्य-शक्तीने होईल, अहिंसाशक्तीने होणार नाही, तोपर्यंत पुरुषांचा दर्जा स्त्रियांपेक्षा अधिक उच्च मानला जाईल असे विनोबांचे म्हणणे आहे. ‘रक्षणाचे साधन हिंसाच राहील तर जीवन पुरुषप्रधान असणारच. म्हणून समाजाचे संरक्षण अहिंसक पद्धतीने करण्याची शक्ती समाजात असली पाहिजे’ अशी विनोबांची मागणी आहे.

स्त्रियांची निसर्गदत्त शारीरिक मर्यादा व आजची त्यांची मानसिकता याचे पूर्ण भान विनोबांना आहे. म्हणून ते म्हणतात, “लंकेत सीता एकटी होती, पण रावण तिला काही करू शकला नाही. परंतु हा झाला आदर्श. स्त्रियांमध्ये इतकी आदर्श शक्ती अपेक्षित नाही. तर मग त्यांनी काय करावे? आपल्याजवळ रिव्हाल्वर ठेवावे. कुणी आक्रमण करायला आला तर त्यावर गोळी चालवावी. अशा त-हेने मारावे की तो घायाळ होईल, मरणार नाही. पण समजा, हे बरोबर साधले नाही अन तो मेला तरी काही हरकत नाही…अशा प्रकारे जी पिस्तुल चालवेल तिला मी अहिंसक मानतो.” ही सवलत विनोबा अपवादात्मक परिस्थितीत देत आहेत. याचा अर्थ अपवादाने हाच नियम सिद्ध होतो, की स्त्रियांनी आपले व समाजाचे संरक्षण आत्मबलाने व अहिंसेच्या मार्गानेच करावे.

हिंसक व शस्त्राधारित संरक्षणनीती निर्माण करून पुरुषांनी जसे स्त्रीला अबला ठरविले तसेच तिची म्हणून असणारी काही खास उत्पादनाची साधने पुरुषांनी हिसकावून तिला आर्थिकदृष्ट्या दुर्बळ केले आहे. विशेषत: विणकाम, शिवणकाम व स्वयंपाक हे तिचे क्षेत्र होते, पण आज ही सारी उत्पादनाची साधने पुरुषांच्या हाती गेली आहेत. म्हणून आरक्षणाची मागणी करताना विनोबा म्हणतात, “जी कामे स्त्रियांना करणे शक्य आहे, ती त्यांच्याकरता राखून ठेवली म्हणजे त्यांना स्वतंत्र प्रतिष्ठा राहील. नाही तर सर्व कामे पुरुषांच्या हाती जातील व स्त्रियांना सदा सर्वदा पुरुषांच्या अधीन राहावे लागेल.”

प्राथमिक शाळा स्त्रियांच्या हाती असल्या पाहिजेत असे ते म्हणतात. तसेच साहित्य, शिक्षण, धर्माचे आयोजन इत्यादी क्षेत्रात स्त्रियांना स्थान मिळाले पाहिजे अशी मागणी विनोबा करतात. आणि ‘जी जी क्षेत्रे सांस्कृतिक म्हणून समजली जातात, ती ती सारी क्षेत्रे स्त्रियांनी आपल्या हाती घ्यावी’ असा सल्ला देतात.

ज्या काळात ‘स्त्रीमुक्ती’ची मागणी जोरात होती त्या काळात विनोबा ‘स्त्रीशक्ती’ची भाषा बोलत होते. स्त्रियांना आध्यात्मिक अधिकार मिळावा, ब्रह्मचर्य हे तत्त्व त्यांच्यात दाखल व्हावे व वैराग्य-संपन्न होऊन त्यांची आत्मशक्ती जागृत व्हावी यासाठी विनोबांनी ‘ब्रह्मविद्या मंदिर’ या आश्रमाची स्थापना केली.

स्त्रियांमध्ये ब्रह्मचर्य हे तत्त्व दाखल व्हावे म्हणून जरी ‘ब्रह्मविद्या मंदिर’ या आश्रमाची स्थापना विनोबांनी केली असली, तरी त्यात केवळ बालब्रह्मचारिणीलाच प्रवेश होता असे नव्हे, तर हा विचार स्वीकारणाऱ्या विधवा व परितक्त्या स्त्रीलादेखील त्यांनी प्रवेश दिला. एवढेच नव्हे तर आश्रमात आल्यावर मोहवश कार्यकर्त्यांशी संबंध आलेल्या भगिनीला तिच्या बाळासह ठेवून घेतले. हा केवळ करुणेचा भाग नव्हता तर बह्मविद्येच्या मार्गावर चालणाऱ्या व चुकून पडली तरी पुन्हा उठून जिद्दीने त्याच मार्गावरून चालणाऱ्या भगिनीचा तो अधिकार विनोबांनी केवळ मान्यच केला नाही, तर तो तिला सन्मानपूर्वक मिळवून दिला. अशा प्रकारे स्त्रीशक्तीला पूर्ण वाव मिळवून देणाऱ्या विनोबांच्या विचारात व कृतीतच क्रांतितत्व सामावले आहे.

Upcoming Events

Artist : Sanjeev Joshi